शुक्रवारी होणार वितरण; कॉ. आनंद मेणसे यांची प्रमुख उपस्थिती
। सांगली । प्रतिनिधी ।
विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार साम्यवादी विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो यांना देण्यात येणार आहे. कॉ. कांगो विद्यार्थी दशेपासून साम्यवादी विचार आणि चळवळीत सहभागी आहेत. कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नासाठी सदैव रस्त्यावर उतरुन संंघर्ष करण्यात ते अग्रेसर असतात.
सुरवातीपासूनच मार्क्सवादावर त्यांची निष्ठावादी आहे. क्रांतिसिंह नानापाटील यांनी आयुष्यभर ज्या विचारांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले, त्याच विचारावरुन आपली वाटचाल करणारे कांगो यांचे योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. पुरस्कार वितरण शुक्रवारी (दि. 6) विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाच्या सभागृहामध्ये दु. 1.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. बेळगावचे कॉम्रेड प्राचार्य आनंद मेणसे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येणार आहे.
मानपत्र, गौरवचिन्ह, महावस्त्र, श्रीफल, पुष्पहार आणि एकवीस हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आतापर्यंत हा पुरस्कार, आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, कॉम्रेड कृष्णा मेणसे, मेघाताई पाटकर, विकास आमटे , डॉ. अभय बंग, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, कॉ. सिताराम येंचुरी, पद्मश्री डॉ. गणेश देवी आदींना देण्यात आला आहे.