| मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेस पक्षाकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी (दि.25) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.26) वर्षा गायकवाड यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघातून निवडणूक लढणार असल्याने आपण त्यांची भेट घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवणे, हीच सध्या आमची भावना आहे. देशात हुकूमशाही येता कामा नये, राज्य घटनेचे रक्षण करायचे असून घटना बदलता कामा नये, त्याकरिता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढून जिंकणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असून त्या कोठूनही उभ्या राहिल्या तरी विजयी होतीलच, असेही ठाकरे म्हणाले.