भातशेतीला शेतकऱ्यांना नवा पर्याय; 4017.17 हेक्टरवर भाजी लागवड
| रायगड | प्रतिनिधी |
औद्योगिकरणाच्या रेट्यामुळे रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार ओळख हळूहळू पुसू लागली आहे. एकीकडे उद्योग क्षेत्र वाढले तर दुसरीकडे पीक क्षेत्र कमी झाले. यामुळे जिल्ह्यातील भात पिकाचे क्षेत्र कमी होऊन उत्पादकता कमी झाली. कृषी क्षेत्र घटले तरी शेतकऱ्यांनी भात लागवड क्षेत्राला पर्याय म्हणून भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. गेले काही वर्षात जिल्हा भाजीपाला लागवडीमध्ये प्रगती करताना दिसत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी 4017.17 हेक्टरवर भाजी लागवड करून नवा अध्याय लिहिला आहे. या भाजीच्या उत्पादन विक्रीला जिल्ह्यातील प्रमुख शहरे, आठवडा बाजार आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडधान्ये, तृणधान्ये आणि भाजी लागवडीवर अधिक भर दिला आहे. यासाठी शेतीचा वापर करण्याबरोबरच डोंगर उतारावरील क्षेत्राचा वापर करून भाजी लागवड करून साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वाढण्यास सुरुवात केली आहे. आपसूकच याचे सारे श्रेय जिल्हा कृषी विभागाला जाते. जिल्ह्यात भाजी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे सहज उपलब्ध करून दिले जात आहे. पालेभाजी लागवड करण्यासाठी केले जाणारे वाफे आणि त्यासाठीचे बियाणे उपलब्ध होत असल्याने मेथी, चवळी, मुळा, माठ, पालक, कोथिंबीर, कांदा याची लागवड केली जात आहे. त्याचबरोबर टोमॅटो, कारले, शिराळे, घेवडा, तूर, घोसाळे, तोंडली, कोबी, फ्लॉवर, मिरची, सुरण, भेंडी, वांगी, दुधी, कलिंगड, दोडका, काकडी, पडवळ या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या लागवडीतून भरघोस उत्पादन होत असून या भाज्यांना स्थानिक बाजारपेठांमध्ये अधिक मागणी आहे.
जिल्ह्यात भाजी लागवड करणाऱ्या तालुक्यांमध्ये अलिबाग तालुक्याचा क्रमांक अग्रस्थानी आहे. अलिबाग तालुक्यात 990 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ माणगाव तालुक्याचा क्रमांक लागतो. माणगाव तालुक्यात 771. 20 हेक्टर क्षेत्रावर भाजी पिकविली जाणार आहे. पेण तालुक्यात 420. 55 हेक्टर, मुरुड तालुक्यात 73.10 हेक्टर, पनवेल तालुक्यात 708 हेक्टर, उरण तालुक्यात 63. 27 हेक्टर, खालापूर तालुक्यात 82. 80 हेक्टर, कर्जत तालुक्यात 120.40 हेक्टर , तळा तालुक्यात 51.55 हेक्टर, रोहा तालुका 322.30 हेक्टर , पाली तालुक्यात 161.55 हेक्टर, महाड तालुक्यात 126.20 हेक्टर, पोलादपूर तालुक्यात 36.80 हेक्टर म्हसळा तालुक्यात 51 ह्रक्टर आणि श्रीवर्धन तालुक्यात 37.50 हेक्टर क्षेत्रावर भाजी पाला लागवड करण्यात येणार आहे.
भाजी लागवड क्षेत्र
वांगी 287.82 हेक्टर
मिरची 297. 18 हेक्टर
कारली 543.87 हेक्टर
दुधी 210.20 हेक्टर
घोसाळी 110.95 हेक्टर
तोंडली 253.40 हेक्टर
सफेद कांदा 221.10 हेक्टर
भेंडी 247.04 हेक्टर
कलिंगड 682. 93 हेक्टर
टोमॅटो 101.29 हेक्टर
दोडका 219.23 हेक्टर
काकडी 221. 04 हेक्टर
पडवळ 4.40 हेक्टर
इतर भाजीपाला 610.42 हेक्टर