भाज्यांचे भाव भिडले गगनाला

घरखर्च चालविण्याचे गृहिणींपुढे आव्हान

| तळा | वार्ताहर |

सध्याच्या काळात सर्वच वस्तूंचे भाव वाढले असताना आता दैनंदिन लागणाऱ्या भाज्यांचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घरखर्च चालविण्याचे गृहिणींपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

यावर्षी सुरुवातीलाच दमदार कोसळलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेला भाजीचा माल मोठ्या प्रमाणावर कुजला आहे. परिणामी, भाज्यांची आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे भाजी मंडईत भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त किमतीने भाज्यांची खरेदी करावी लागत असल्याने परिणामी बाजारपेठेत किरकोळ भाज्यांच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर, ओली, सुकी मच्छी, किराणा सामान यांच्या किमती आधीच भडकलेल्या असताना आता बाजारपेठेतील भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींना घरखर्च चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी बाजारपेठेत गावठी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना या भाज्यांचा मोठा आधार होता. परंतु, पावसाचा गावठी भाज्यांना मोठा फटका बसला असून, भाज्या कुजल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

सध्या बाजारात असलेल्या भाज्यांचे दर
मटार 200 रु.किलो, कोबी 60 रु.किलो, फ्लॉवर 80 रु.किलो, वांगी 60 रु.किलो, टोमॅटो 80 रु.किलो, शिमला मिरची 80 रु.किलो, गवार 120 रु.किलो, घेवडा 160 रु.किलो, कोथिंबीर 40 रु.जुडी, मेथी 40 रु.जुडी, फरसबी 200 रु.किलो, गाजर 80 रु.किलो.
Exit mobile version