| सुतारवाडी | प्रतिनिधी |
भिरा फाटा ते विळे दरम्यान बारा गतिरोधक आहेत. मात्र, अनेक महिन्यांपासून या गतिरोधकांवर गतिरोधक दर्शक पट्ट्या नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांची या ठिकाणावरून जाताना मोठ्या प्रमाणात आदळा आपट होत असून वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुतारवाडी येथून पुणे केवळ शंभर किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सुतारवाडी आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस असल्यामुळे वर्षभर पर्यटक या मार्गावरून प्रवास करत असतात. तसेच, या परिसरात मोठं मोठ्या कंपन्या असल्यामुळे या मार्गावरून अवजड सामान घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची सातत्याने ये-जा असते. त्यामुळे काही ठिकाणचे गतिरोधक सपाट झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये हे गतिरोधक दिसत नसल्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे भिरा फाटा ते विळे दरम्यानच्या मार्गावर लवकरात लवकर गतिरोधक दर्शक पट्ट्या बसवण्याची मागणी स्थानिकांसह प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.







