स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत वाहन तपासणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहेत. या पथकांमार्फत ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी केली जात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रायगड जिल्हयातील अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, श्रीवर्धन, महाड या सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबरपासून सुरु झाला. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. महसूल विभागासह वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत.

अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा अलिबाग-मुरूड मार्गावरू येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत केली जात असताना भरारी पथकामार्फतदेखील ठिकठिकाणी भेटी देऊन तेथील पाहणी केली जात आहे. गावात होणार्‍या सभांवरही पथकाद्वारे लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातील वेगवेगळ्या मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहे. व्हीडीओग्राफर, पोलीस व अन्य विभागातील कर्मचारी असे एकूण चार जण या ठिकाणी नेमण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांना सकाळी दहा ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी दहा असे कामाचे तास ठरविण्यात आले आहे. तब्बल बारा तास त्यांना कर्तव्य बजावावे लागत आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात फक्त आठ तास काम आणि एक आठवड्यातून सुट्टी अशी व्यवस्था तेथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. परंतु अलिबागमधील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रीया कर्मचार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. हा दुजाभाव का, असा सवाल कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात
अलिबाग - रोहा अलिबाग पेण अलिबाग मुरूड मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडी पसरली आहे. मातीची धुळ स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचार्‍यांच्या तोंडात जात आहे. काही कर्मचार्‍यांना घशाचा त्रास झाला आहे. त्यांना तोंडावर लावण्यासाठी मास्कची सुविधा नसल्याने या कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

स्थिर सर्वेक्षण पथकातील प्रमुखांशी संपर्क साधून कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत माहिती घेतली जाईल. कर्मचार्‍यांना त्रास होत असेल, तर त्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल.

मुकेश चव्हाण
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी
Exit mobile version