वाहनचोरांचा उरणमध्ये सुळसुळाट

गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुदंड

| उरण | वार्ताहर |

औद्योगिकीकरण वाढल्याने उरण शहरासोबत उरण ग्रामीण भागातील परिसराचा आवाका दिवसागणिक वाढत आहे. नोकरी धंद्यानिमित्त उरण शहरात परप्रांतीय नागरिक राहण्यास आल्याने तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे शहरीबरोबरच ग्रामीण भागांत सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांची नितांत गरज आहे. मात्र, उरण परिसरातील ग्रामीण भाग सीसीटिव्ही सारख्या मुलभूत सुविधेपासून अजूनही वंचित असल्याने वाहनचोरांचे फावले आहे.

उरण शहरासोबतच नजीकच्या गावात देखील बाजारपेठा विस्तारल्या आहेत. वाढते औद्योगिकरण पाहता शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात घर कमी भाड्यात मिळत असल्याने परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने उरणमधील ग्रामीण भागांत स्थिरावत आहेत. पण वाढत्या लोकसंख्येचे दुष्पपरिणाम सध्या ग्रामीण भागांतील रहिवाशांना सोसावा लागत आहे. कारण सध्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वाहनांचे पार्ट चोरी करून विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे कष्ट करून हप्त्यांवर घेतलेल्या गाड्यांचे पार्ट चोरीला जात असल्याने गोरगरीब नागरिकांना अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पुरावा नसल्याने चोरटे बिनधास्त
उरण परिसरात पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, पानदिवे, कळंबुसरे, चाणजे, पाणजे याप्रमाणे अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे सीसी टीव्ही कॅमेरे नसल्याने वाहनाचे पार्ट चोरी करणाऱ्या चोरट्यांचे फावले आहे. कॅमेरे नसल्याने या चोरट्यांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्याने चोरांवर कायद्याची दहशतच नाही. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे सीसी टीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर या घटनांना आळा बसेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
शहराच्या सुरक्षेवरच भर
उरण शहरातील 85 ठिकाणांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यात एनएडी पट्रोल पंप, एनएमएमटी बस स्टॉप, स्वामी विवेकानंद चौक केगावकडे जाणारा रस्ता एनआय हायस्कूल चौकजवळ, विमला तलाव, गणपती मंदिर चौक रस्ता, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल रोड, आनंदनगर रस्ता, चारफाटा, जरीमरी मंदिर, राघोबा मंदिर, कामठा चौक, जामा मशीद, उरण, बोरी स्मशानभूमी, महात्मा गांधी पुतळ्याजवळ, गांधीचौक, बोरीचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पिरवाडी समुद्र किनारी सीसी टीव्ही कॅमेरे बसणार आहेत.
Exit mobile version