वाहनचालकांचे महामार्गावर हालच
| महाड | वार्ताहर |
पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून सीएनजीवर चालणारी वाहने अनेक कंपन्यांकडून उत्पादित करण्यात आली. मात्र सीएनजी पंपांच्या कमतरतेमुळे आणि पंपांवर होत असलेल्या मनमानीमुळे सीएनजी वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यामुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे, त्याचबरोबर कोकणात सुट्ट्यांसाठी चाकरमानीदेखील दाखल झालेले आहेत. या सर्व वाहन चालकांना मुंबई-गोवा महामार्गावर सीएनजीअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी पंपांवर कधीकधी तासन्तास उभे राहावं लागत आहे. त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग यादरम्यान फारच कमी सीएनजी पंप आहेत. पनवेल सोडल्यानंतर पेण, रोहा, नागोठणे, माणगाव, इंदापूर, आणि पुढे थेट खेडमध्ये सीएनजी पंप उपलब्ध होता. नुकताच महाड आणि पोलादपूर मध्ये सीएनजी पंप सुरू करण्यात आलेला आहे. महानगर गॅसच्या माध्यमातून हे पंप सुरू झालेले आहेत. सीएनजी पंपांवर सीएनजीने भरलेल्या दिवसाला दोन ते तीन गाड्याच दाखल होत असतात. सीएनजी उपलब्ध झाल्याचे समजतात पंपाबाहेर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. रांगेत असतानाच पंपामधील सीएनजी संपल्यानंतर वाहन चालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अनेक वेळा वीज खंडित झाल्यास किंवा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास सीएनजी भरण्यास आलेल्या वाहन चालकांना ताटकळत उभे राहावे लागते.
महाडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महानगर गॅसच्या पंपामध्ये दिवसाला तीन गाड्या उपलब्ध होतात. यामध्ये साधारण 400 पासून 1 हजार किलोपर्यंत सीएनजी उपलब्ध होतो. सध्याच्या काळामध्ये मागणी अधिक असून, महानगर गॅसकडून कमी पुरवठा होत असल्याचेदेखील महाडमधील पंपाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. उपलब्ध गॅस हा केवळ तीन ते चार तास उरतो, त्यामुळे मुंबईकडे जाणार्या आणि मुंबईकडून पुन्हा सिंधुदुर्ग, गोवा, दापोलीकडे जाणार्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.