ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांनी वयाच्या 87 व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. परंतु, त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले. प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.