| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील बोर्ली व कोर्लई गावात संशयास्पद लम्पी स्किन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. ज्यामध्ये जनावरांना अंगावर गाठी येणे अशी लक्षणे दिसत येत आहेत. आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अशी जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार मुरुड व पशुसंवर्धन विभाग मुरुड जंजिरा यांनी केले आहे. तसे पत्र तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना देण्यात आले आहे.
या आजाराचा प्रसार हा डास, माशा, गोचीड, दूषित चार व पाणी इत्यादी पासून होत असल्याने गावात योग्य ती फवारणी करून घ्यावी, याप्रमाणे काळजी घेतल्यास रोग आटोक्यात आणण्यास मदत होईल, तरी पशु संवर्धन विभागास सहकार्य करून वेळेत आजार नियंत्रणास मदत करावी, असे आवाहन तहसीलदार मुरुड व पशुसंवर्धन विभाग मुरुड यांनी केले आहे. सध्या पशुैद्यकीय विभागाकडून जनावरे ज्या गोठ्यात बांधली जात आहेत, तिथे औषधांची फवरणी करण्याचे काम जोरात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुरुड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन पाडावे यांनी सांगितले की, कोर्लई व बोर्ली येथील जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. तातडीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र देण्यात आली आहेत. लम्पी आजारची लक्षणे दिसताच नजीकच्या दवाखान्यात संपर्क साधून आपल्या पाळीव जनावरांचा इलाज करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.