कर्जत मतदारसंघात जागता पहारा

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मदारसंघात कोणत्याही रस्ते मार्गाने अनैतिक स्वरूपातील वस्तूंची वाहतूक होऊ नये यासाठी स्थिर निगराणी पथके निर्माण करण्यात आली आहेत.कर्जत आणि खालापूर येथील चार ठिकाणी अशी स्थिर निगराणी पथके बनविण्यात आली आहेत. दरम्यान, कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत आमिषे दाखवणार्‍या वस्तूंची वाहतूक होऊ नये, यासाठी हि स्थिर निगराणी पथके मदत करीत आहेत.

निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर कोणत्याही प्रकारे मतदारांवर आमिषे दाखवणार्‍या वस्तूंची वाहतूक होऊ नये आणि मतदान शांततेत पार पाडले जावे यासाठी आदर्श आचारसंहिता राबविण्याचे अनुषंगाने काम केले जात आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्याचा अर्धा भाग समाविष्ट आहे.त्याचवेळी दोन राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्प्रेस वे असे महत्वाचे रस्ते जातात. यामुळे सतत वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून होणारी अवैद्य गोष्टींची वाहतूक थांबविण्याचे मोठे आव्हान कर्जत मतदारसंघ निवडणूक यंत्रणेपुढे आहे. याही स्थितीत कर्जत मतदारसंघाच्या स्थिर पथकाने पहिल्या टप्प्यात चांदीचे बॉक्स पकडले होते.

या सर्व स्थिर पथकाचे नियंत्रण कर्जत प्रशासकीय भवनमधील निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून होत असल्याची माहिती पथकाचे समन्वयक कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली.

Exit mobile version