विकटगडावरील विकटेश्‍वर

?

| संतोष पेरणे | नेरळ |
छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ वास्तव्य राहिलेल्या माथेरानच्या डोंगर रांगांतील विकटगड हा अनेक बाबींनी वेगळा समजला जातो. सूरत लुटून महाराजांनी सर्व संपत्ती थेट रायगडावर न नेता या विकटगडावर ठेवली होती. त्यामुळे ते वित्त व्यवस्थित सांभाळणार्‍या गडाला महाराजांनी विकटगड असे नाव दिले. पुढे या किल्ल्यावर भगवान शंकराची पिंडी प्रतिस्थापित केली. त्या पिंडी आजही तेथे आपले अस्तित्व ठेवून आहे. श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक तेथे मोठ्या प्रमाणात विकटेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून जात असतात.

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेले विकटगडा वरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराज यांनी सूरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव ‘वित्तेश्‍वर’ असे पडले असल्याने बोलले जाते. शके 1937 मध्ये सह्याद्रीच्या सुळकावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई ग्यॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग असलेल्या मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून, एकाच ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची रुपे तेथे पहायला मिळतात. या शिव मंदिराचे विशेष म्हणजे, डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंडं आहेत. त्या कुंडाच्या मध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडांवरील दगडांवर अनेक चित्रे कोरली असून, पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशाप्रकारे अगदी जवळ जवळ ती कुंडं आहेत. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर ज्याप्रमाणे भगवान शंकरांची मंदिरे आहेत, त्याप्रमाणे किल्ला बांधताना पूर्वेकडे भगवान शंकराची पिंडी प्रस्थापित केली, तेव्हापासून या किल्ल्यावर विकटेश्‍वराचे मंदिर आहे.

श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्त विकटेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तेथे शंकराच्या पिंडीवर अभिषेकदेखील करता येत असल्याने भाविक वेळ काढून विकटगडावर पोहोचतात. कारण, तेथे पोहोचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असूनदेखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देऊन दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाईप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर आपण मंदिराजवळ पोहोचतो.

Exit mobile version