ग्रामस्थांचे नगरपरिषद प्रशासनास निवेदन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जतचे जागृत ग्रामदैवत धापाया महाराज मंदिरातील गाभारा बाराही महिने पाण्याने भरलेला असतो. यापूर्वी असे कधीही होत नसे, फक्त पावसाळ्यामध्ये गाभाऱ्यात थोडेसे पाणी जमा होत असे. पावसाळा संपल्यावर महिन्याभरातच पाणी ओसरत असे. हे वास्तव सांगायला आजही कर्जत गावातील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक साक्षीदार आहेत. याबाबत ग्रामस्थांनी नगरपरिषद प्रशासनास निवेदन दिले आहे.
सामजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे, भाई आणेकर, माजी नगरसेवक मुकेश पाटील, महेंद्र चंदन, मनोज वरसोलीकर, मोहन भोईर यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात धापाया महाराज मंदिरातील गाभारा बाराही महिने पाण्याने भरलेला असतो. यापूर्वी असे कधीही होत नसे, फक्त पावसाळ्यामध्ये गाभाऱ्यात थोडेसे पाणी जमा होत असे.
पावसाळा संपल्यावर महिन्याभरातच पाणी ओसरत असे. असे का होते यावर निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की, नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी कर्जत शहरातील मुख्य गटारातील बांधकाम केले. ते नियोजनपूर्वक न केल्यामुळे बाजूच्या मुख्य गटारातील पाण्याला पुढे जाण्यास, जो उतार द्यावयास पाहिजे होता, तो न दिल्यामुळे पाणी साचून तुंबून राहते. त्यामुळे गटारातील घाण पाणी झिरपून बाजूलाच असणाऱ्या मंदिरातील गाभाऱ्यात जमा होते व दुर्गंधी येते. ही बाब कर्जतकरांची भावना दुखवणारी व संतापजनक अशी आहे. याबाबत याआधी धापाया देवस्थान समितीनेही निवेदन दिलेले आहे. परंतु, अद्यापपर्यंत काहीएक उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याबाबत त्वरित कार्यवाही करून गटारातील पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपाय योजना करावी तसेच ग्रामदैवत धापाया महाराजांच्या भाविकांच्या भावनेचा आदर करावा, अशी विनंती केली आहे.