| रोहा | प्रतिनिधी |
रोहे ग्रामीण भागात विशेषतः जंगल परिसरात गावठी दारूनिर्मितीचे अवैध धंदे खुलेआमपणे सुरु होते. पोलीस उप अधीक्षक रवींद्र दौडंकर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोहा पोलिसांनी शुक्रवारी खडकी या जंगलात रात्रीच्या वेळी जाऊन गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. तसेच, गावठी दारूचा धंदा करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणासुदीच्या पार्श्ववभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गावठी दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांना गावठी हातभट्टी दारूसाठी लागणारे 60 लिटर तयार दारूचे 3 प्लास्टिकचे ड्रम, 6 निळ्या रंगाचे नवसागर मिश्रित रसायने भरलेले पिंप असे एकूण 91,200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन केला आहे. या बाबत पोलीस कर्मचारी राजेंद्र कोंडार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी मिथुन काशिनाथ हिरवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







