22 हजारांचे 540 लीटर गुळमिश्रित रसायन नष्ट
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेराठी, काळकाईलगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या नागोठणे पोलिसांच्या पथकाने उद्ध्वस्त केल्या आहेत. स.पो.नि. संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
शुक्रवार (दि.19) सकाळी 7 ते 10 वा.च्या दरम्यान धाड टाकून अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त करुन सुमारे 22 हजार रूपये किमतीचे गूळमिश्रित रसायन व दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले. दरम्यान, यापूर्वीही अनेकवेळा नागोठणे पोलिसांकडून परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट करण्यात आल्या आहेत. असे असले तरी याप्रकरणी आरोपी मोकाटच फिरत असल्याने व त्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्यानेच पुन्हा पुन्हा या गावठी दारूच्या हातभट्टी सुरु होत आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.