| चिपळूण | प्रतिनिधी |
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात लाखोंची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. चिपळूण, सावर्डा व शिरगाव पोलिसांमार्फत ठिकठिकाणी हातभट्टीवर धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये लाखोंचा ऐवज जप्त झाला असून, अनेकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील वहाळ कोष्टेवाडी येथे एका हातभट्टीवर धाड टाकून सावर्डे पोलिसांनी 1 लाख 12 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धाड 24 ऑक्टोबर रोजी पोलीस शिपाई सारिका जाधव यांनी टाकली. यामध्ये गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये 1 हजार 100 लीटर कुजके रसायन व दारू गाळण्याचे साहित्य असा 1 लाख 12 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. शिरगाव पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाकडे विनापरवाना एक हजार रूपयांची हातभट्टीची दारू आढळून आली आहे. याप्रकरणी सीताराम शिर्के (रा. पोफळी शिर्केवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील नारदखेरकी येथे हातभट्टीची दारू गाळत असताना चिपळूण पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले आहे. प्रसाद अनंत हळदणकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 86 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत. ही कारवाई चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.