। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे दोन कारची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलीस दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिका व खासगी वाहनाने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर दोन कारची समोरासमोर धडक झाली. कारचालक अतुल आनंद किशोर नंदा (34), रा. फरिदाबाद हा गोव्याकडून मुंबईकडे जात होता. तर दुसरा कारचालक ओंकार शंकर घाडगे (23) रा. पाटण-आंबळे, हा सातार्याहून गणपतीपुळेकडे जात होता. दरम्यान सुसाट वेगात येणार्या दोन्ही मोटारींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, गोव्याच्या दिशेने धावणारी मोटार मुंबईच्या दिशेने फिरली. एका मोटारीची एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली. या अपघातात सात जण जखमी झाले असून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे करत आहेत.