। म्हसळा । प्रतिनिधी ।
तालुक्यात आतापर्यंत महसुली नोंदीनुसार तब्बल 5953 मिमी पाऊस पडला आहे. मेंदडी धरण ओव्हरफ्लो होत असतानादेखील वारळ गावातील ग्रामस्थांना गेल्या सहा दिवसांपासून पिण्याचे पाणी मळािलेले नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रशासन यंत्रणेच्या दुर्लक्षामुळेच गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ग्रामस्थ पुनित राम सावंत आणि चंद्रकांत हरिभाऊ पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, उपसरपंच हे मुंबईत राहतात, त्यामुळे स्थानिक प्रश्नांकडे योग्य लक्ष दिले जात नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता यांनी सांगितले की, धरणातून पुरवठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्वतंत्र एजन्सीकडे आहे. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतीचा समन्वय आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, योजना हस्तांतरण केली असल्याचे सांगत ग्रामपंचायतीने लक्ष घालणे आवश्यक असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
वारळकरांच्या घशाला कोरड
