वसुधा सोसायटी विरोधात ग्रामस्थांचे उपोषण

। सुधागड-पाली। वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक उन्नती वनीकरण व वृक्षलागवड संस्थेने वाफेघर व विडसई गावकर्‍यांचे सर्व बंद केलेले रस्ते खुले करावेत, गुरांचे पाणवठ्यावर जाण्याचे व उभे राहण्याची ठिकाण खुली करावीत, तसेच या ठिकाणी होत असलेले अनधिकृत आर सी सी बांधकाम थांबवावे या मागण्या वाफेघर व विडसईतील काही ग्रामस्थांच्या आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी सुधीर वाघमारे हे ग्रामस्थ सोमवारी (ता.7) पाली तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसले आहेत.
सुधा संस्थेकडून शासन आदेश व नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे. ग्रामस्थांनी येथील अनधिकृत बांधकामा सबंधी 10 ऑगस्ट 21 रोजी पाली तहसीलकार्यालयाबाहेर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पाली तहसीलदार यांनी कारवाई करून संस्थेचे अनधिकृत बांधकाम पाडले होते. मात्र प्रशासनाच्या या कारवाईनंतर देखील संस्थेने पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू केलेले आहे. संस्थेने यासंदर्भात शासनाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केलेली आहे. उच्च न्यायालयात ही याचिका अजून प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागलेला नसताना संस्था बांधकाम चालू ठेऊन उच्च न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे. उपोषणावेळी सुधीर वाघमारे यांच्या समवेत राजेश वाघमारे, अ‍ॅड. अमोल कांबळे व गणेश चव्हाण आदींसह विडसई व वाफेघर ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version