ग्रामस्थांचा वहिवाटीचा रस्ता बंद

डोलवी ग्रामपंचायतीचा प्रताप
। पेण । वार्ताहर ।
डोलीव ग्रामपंचायत हद्दीतील कामतवाडी व देवर्षीनगर येथील रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता ग्रामपंचायतीने बंद केला असून, याबाबत तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे.

या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, आम्ही डोलवी ग्रामपंचायतीचे रहिवासी असून, गेली कित्येक पिढ्या आमच्या कामतवाडी व देवर्षीनगर येथे राहात असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होण्याअगोदर तत्कालीन सरपंचांनी आमच्या वाड्यांवर जाण्यासाठी योग्यप्रकारचा रस्ता केला होता व त्याचा वापर आम्ही आजतागायत करत आहोत. मात्र, गेल्या वर्षी ऐन गणपती उत्सवाच्या वेळेत आमच्या वहिवाटीचा रस्ता ग्रामपंचायत डोलवीने बंद केला. याचा जाब सरपंचांना विचारला त्यावेळी सरपंचांनी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता सुरू केला व भविष्यात योग्यप्रकारे रस्ता करून दिला जाईल, असा शब्द दिला. त्यामुळे आम्ही सरपंचांच्या शब्दावर विश्‍वास ठेवून कोणत्याही शासकीय कार्यालयात आम्ही दाद मागितली नाही. मात्र, ज्या वेळेला पुन्हा आम्हाला ग्रामपंचायत आमचा रस्ता बंद करतेय, अशी कुणकुण लागली, त्यावेळा आम्ही 27 मे रोजी सरपंचांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालयात रितसर अर्ज करून रस्त्याबाबत विचारणा केली.

तसेच आमच्याजवळ असणारी सर्व कागदपत्रं व पुरावे ग्रामपंचायतीला दिले. मात्र, आमच्या अर्जाचा विचार न करता ग्रामपंचायतीने 30 मे रोजी दगड सिमेंटच्या सहाय्याने पक्के बांधकाम केले. याबाबत डोलवी सरपंच वनिता म्हात्रे यांचे यजमान अनिल म्हात्रे यांच्याशी बोलणे केले, त्या वेळेला त्यांनी रस्ता सोडून बांधकाम करण्याचा शब्द दिला. परंतु, तो शब्द न पाळता आमच्या वहिवाटीचा रस्ता कायमस्वरूपी बंद केला आहे. गेले कित्येक पिढ्या आम्ही त्याच रस्त्याचाच वापर करत असल्याने त्या रस्त्याव्यतिरिक्त आम्हाला दुसरा रस्ता उपलब्ध नाही. सदरील रस्त्यामुळे जवळपास दीडशे ते दोनशे ग्रामस्थ बाधित होत आहेत. यामध्ये साधारणतः आम्ही आदिवासी समाजाचे 100 ते 125 नागरिकदेखील आहोत. त्यामुळे आमच्या हक्काचा, आमच्या वहिवाटीचा रस्ता तातडीने आम्हाला मिळावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनामध्ये केली आहे.

निवेदन घेताना तहसीलदारांनी सांगितले की, वहिवाटीचा रस्ता कुणालाही बंद करता येणार नाही. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तर, डोलवी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.एम. मोहलकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या ग्रामस्थांचा अर्ज ग्रामपंचायतीकडे आला आहे. तो मी सरपंचांसह सदस्यांकडे ठेवला आहे. मात्र, तो विषय आता प्रलंबित आहे. त्यासंदर्भात सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करून त्याचा निर्णय दिला जाईल.

Exit mobile version