पर्यावरण अनुमती जनसुनावणीत ग्रामस्थांचा विरोध

जनसुनावणीबाबत आक्षेप नोंदवत घेतल्या हरकती
। माणगांव । प्रतिनिधी ।

निजामपूर येथे पार पडलेल्या प्रस्तावित दिघी बंदर आधारित औद्योगिक क्षेत्राच्या पर्यावरण अनुमतीसाठीच्या जनसुनावणीला निजामपूर विभागातील ग्रामस्थांनी प्रचंड विरोध करीत ही जनसुनावणी बेकायदेशीर ठरवण्याची मागणी करीत संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरीत विविध मुद्यावर आक्षेप नोंदवत हरकती घेतल्या. त्यामुळे ही जनसुनावणी सभा वादळी ठरली.


दिल्ली मुंबई कॉरीडॉर अंतर्गत निजामपूर विभागात होऊ घातलेल्या प्रस्तावित दिघी बंदर प्रकल्पासाठी प्रदुषण महामंडळ महाड यांनी शुक्रवारी (दि.8) दुपारी 12.30 वा. निजामपूर येथील गवळी समाज हॉलमध्ये घेतलेल्या जनसुनावणीस रायगड निवासी उपजिल्हाधिकारी बैनाडे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कारंडे, काळ प्रकल्प 2 चे उपविभागीय अधिकारी राऊत, माणगाव तहसिलदार प्रियंका आयरे कांबळे, पनवेल एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रविंद्र बोंबले यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी तसेच औद्योगिक महामंडळाचे संबंधित अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित अधिकार्‍यांनी सुरूवातीस उपस्थितांना औद्योगिक क्षेत्राबद्दल प्रोजेक्टरवरून माहीती सांगण्यात आली. नंतर या सुनावणीमधे ग्रामस्थांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. संबंधित अधिकार्‍याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने या जनसुनावणीस ग्रामस्थांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावेळी नागरिकानी प्रश्‍नांचा भडीमार करीत आपल्या संतप्त भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात असे ठणकावून सांगत ही सुनावणी शासन व औद्योगिक महामंडळाने पुढे एक महिन्यानी घ्यावी अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.

Exit mobile version