नाल्यात उतरवून रेस्क्यू; 15 जणांचा जीव वाचला
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेट येथे ट्रेकिंगसाठी आलेले 15 जण परतीच्या प्रवासात अडकून पडले. पावसामुळे पाण्याने भरलेला नाला पार करण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केल्याने 15 जणांचे प्राण वाचले. ग्रामस्थांनी नाल्यात उतरून त्या 15 तरूण ट्रेकर्सना नाला पार करून देण्यास मदत केली.
माथेरानमध्ये प्रसिद्ध पॉईंट गार्बेट या ठिकाणी ट्रेकिंगला जाणाऱ्या पर्यटकांनी आपला जीव मुठीत घेऊन नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. कर्जत तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, प्रशासनाकडून विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असतानाही मुंबईहून आलेल्या काही पर्यटकांनी गारबेट ट्रेकिंगला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे एका नाल्याला पूर आला आणि सुमारे वीस ते पंचवीस पर्यटक नाल्याच्या पलीकडे अडकून पडले. यावेळी सागाची वाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी आहात तिथेच थांबा, असे सांगितले. मात्र,या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही पर्यटकांनी नाल्यात उतरून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नाल्याच्या अर्ध्या भागापर्यंत पोहोचताच पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पर्यटक अडचणीत सापडले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत धाडसाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे पर्यटकांचा जीव वाचला आहे.
