| पाली | प्रतिनिधी |
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी सुधागड वनपरिक्षेत्रात वन विभागाच्या पुढाकाराने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले. मजरे जांभूळपाडा, कळंब तसेच घोटवडे या परिमंडळांतील वनक्षेत्रात हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. वनाधिकारी, वनकर्मचारी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारलेले हे बंधारे वनक्षेत्रातील मातीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
सुधागडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे पूर्ण करण्यात आली. संबंधित परिमंडळांतील वनपालांच्या नेतृत्वात वनरक्षक, वनमजूर आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान केले. वनसंपदेच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाल्याने वन विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे विधायक उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. त्यामुळे मातीतील आर्द्रता वाढण्यास, भूजलपातळी सुधारण्यास आणि वनस्पतींना आवश्यक ओलावा उपलब्ध होण्यास हातभार लागतो. विशेषतः पावसानंतरच्या कोरड्या कालावधीत वनक्षेत्रातील झाडे-झुडपांसाठी हा ओलावा उपयुक्त ठरू शकतो.
सुधागडात जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
