पोलादपुरात रस्ते खचल्याने गावे संपर्कहीन

जनजीवन अद्याप विस्कळीतच
पोलादपूर | वार्ताहर |
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर परिसरामध्ये गेल्या 22 जुलै रोजी तब्बल 831 मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्यापासून श्रीराम वरदायिनीचे पार आणि जावळीपर्यंतचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. अशातच महाबळेश्‍वरच्या पायथ्याशी असलेल्या मेटतळी भागामध्ये एका धबधब्यालगत मोठ्या प्रमाणात दरडी रस्त्यावर कोसळून रस्ता खचल्यामुळे महाबळेश्‍वरचा या भागाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तब्बल 22 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही या परिसरातील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले दिसून येत नाही.
पोलादपूर ते प्रतापगड करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आले. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनाला अद्याप महाबळेश्‍वर ते प्रतापगडपर्यंतचा रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात यश आले नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाबद्दल खदखद असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासमोर प्रतापगड परिसर रायगड जिल्ह्यामध्ये घ्यावा, अशी समोरासमोर मागणी केली.
संकट काळामध्ये रायगड जिल्ह्याने दिलेला मदतीचा आधार स्वीकारताना रायगड धावला प्रतापगडाच्या मदतीला अशी कृतज्ञतेची भावना या परिसरातील लोकांमध्ये दिसून आली. दुसरीकडे सातारा जिल्हा प्रशासनाने वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे सुरू केले असून मातीचा भराव वाहून आलेल्या जमिनींची देखील मोजणी सुरू केली गेली आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील भात पीक पूर्णपणे नष्ट झाले असून जागोजागी दगडी कोसळल्यामुळे रस्ते आणि पुल देखील नादुरुस्त झाले आहेत.
प्रतापगड ते पोलादपूर यादरम्यान आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडींचा मलबा हटविण्यात आला असला तरी दरडप्रवण क्षेत्रातून मोठ्या आकाराचे दगड रस्त्यावर अचानक गडगडत येऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना सर्वांनीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Exit mobile version