उरण नगरपालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेच्या अखत्यारीतील विमला तलाव परिसर आता नागरिकांच्या फेरफटक्याचे ठिकाण कमी आणि अनैतिक धंदे, दारू पार्ट्या व नशेखोरीचा अड्डा अधिक बनत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि सुरक्षेच्या पूर्ण अभावामुळे या परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत खुलेआम गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
विमला तलाव परिसरात नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून गार्डन व सुशोभीकरणाची कामे केली. मात्र, प्रत्यक्षात देखभाल आणि सुरक्षेअभावी हा परिसर आता संशयास्पद हालचालींचे केंद्र बनल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळेस तलाव परिसरात अनेक ठिकाणी दिवे बंद असतात किंवा पुरेसा प्रकाश नसल्याने संपूर्ण परिसर काळोखात बुडालेला असतो. याच अंधाराचा फायदा घेत काही टोळक्या तेथे दारू पिणे, नशेचे पदार्थ सेवन करणे आणि अनैतिक कृत्ये करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत काही तरुण-तरुणी आणि संशयित व्यक्ती घोळक्याने बसलेले दिसतात. काही ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि नशेच्या पदार्थांचे अवशेषही आढळत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. “गार्डन आहे की अड्डा?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
विमला तलाव परिसरात ये-जा करण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने “आवो जावो घर तुम्हारा” अशी अवस्था झाली आहे. सुरक्षा रक्षकांची प्रभावी व्यवस्था नाही, सीसीटीव्ही यंत्रणा निष्क्रिय असल्याची चर्चा आहे, तर नगरपालिका प्रशासन याकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विमला तलाव परिसरात रात्री गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, प्रकाशयोजना तातडीने दुरुस्त करावी आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
