बेकायदेशीर बांधकामाचा धुमाकूळ
| श्रीवर्धन | संदेश घोलप |
श्रीवर्धन शहरात सध्या अक्षरशः कायद्याची पायमल्ली सुरू असून, प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. थेट सरकारी रस्ता अडवून बेकायदेशीर काम सुरू असल्याची तक्रार महेश सायगांवकर यांनी केली आहे. तसेच, अपंग व्यक्तींना तहसील कार्यालयात ‘फुकट काम केले जात नाही’, अशा स्वरात वागणुक मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत तक्रारी दाखल होऊनही संबंधित प्रशासन व स्थानिक लोकनेते गप्प असल्याचा संताप नागरीकांनी व्यक्त केला आहे.
श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिर समोरील सावकार वाचनालयापासून सोनार आळीपर्यंत थेट सरकारी रस्ता अडवून बेकायदेशीर काम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या कामामुळे मुख्य बाजाराकडे जाणारा रस्ता अडला असून परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. महेश सायगांवकर यांच्यासह स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे ते जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करत आहेत. निवडणुकी दरम्यान त्यांचा ‘वाहतुक कोंडी’ हा प्रमुख मुद्दा होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर तोच प्रश्न ते पूर्णपणे विसरले आहेत, अशी टीका होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला थेट आव्हान देत म्हटले आहे की, गरीब माणसाने घर बांधताना 5 फूट जागा सोडली नाही तर लगेच टेप घेऊन मोजमाप केले जाते. मग याच प्रकरणात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी स्वतः येऊन रस्त्याचे मोजमाप करून दाखवावे. याचवेळी स्थानिक लोकनेत्यांवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुकीत विविध ठिकाणी कार्यालये उघडली जातात, विकास कामांची घोषणा करत नारळ फोडले जातात; परंतु, गोरगरिबांच्या प्रश्नांवर कितीवेळा आमसभा घेतल्या? गेल्या 20 वर्षांत किती वेळा लोकांसमोर खुली चर्चा झाली? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तसेच, दुसऱ्या एका घटनेचा उल्लेख करताना महेश सायगांवकर यांनी सांगितले की, तहसील कार्यालयात दोन्ही पायांनी अपंग व्यक्तीशी अयोग्य भाषेत बोलण्यात आले. ‘येथे फुकट काम करत नाही’, अशा स्वरातील वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना अशीच वागणूक मिळत असल्याची तक्रार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये संताप तीव्र होत असून, प्रशासन दखल घेत नसेल तर जनतेनेच व्हिडिओ शूटिंग करून पुरावे गोळा करायला सुरुवात केली पाहिजे, अशी भूमिका महेश सायगांवकर यांनी मांडली आहे.
श्रीवर्धन शहरात कायद्यापेक्षा पैशाचे राज्य चालते का? संबंधित प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे? बेकायदेशीर रस्ता अडवून काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल का? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिक मागत आहेत. प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू. आज संबंधित प्रकरणी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि नगरपालिकेत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब संतापजनक आहे.
-महेश सायगांवकर,
तक्रारदार
