| माणगाव | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, कायदेशीर चौकटीत व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, रायगड यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस स्टेशनकडून नागरिक, मतदार व उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, निवडणूक काळात सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर, भडकावू अथवा समाजात तणाव निर्माण करणारे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या वापराबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब इत्यादी माध्यमांवर जात, धर्म, वंश, पंथ किंवा वर्गद्वेष निर्माण होईल, अशी पोस्ट, संदेश, व्हिडिओ, रील किंवा स्टेटस टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, मतदान प्रक्रियेचे जात-धर्माधारित ध्रुवीकरण करणारी कोणतीही सामग्री प्रसारित करू नये. चुकीची माहिती, अफवा वा दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्यांवर आयटी कायदा, भारतीय दंड संहिता व निवडणूक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असून ती शांततेत पार पडणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, निदर्शने, आंदोलने, उपोषणे करण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.







