। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतातील 60 वर्षांच्या जुन्या सरकारी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे खाजगीकरण करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी नुसी, एमयुआय व फुसी या खलाशी कामगारांच्या संघटनांतर्फे संयुक्तपणे 27 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑफिस समोर शांततामय मार्गाने निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये खलाशी कामगारांच्या तिन्हीही युनियन सहभागी झाल्या होत्या. या निदर्शनामध्ये एमयूआयचे जनसंपर्कप्रमुख बाळकृष्ण रानडे, अरुण सावंत, गंगाधर, नूसीतर्फे सुरेश सोळंकी, सलीम झगडे, फुसीतर्फे मनोज यादव सहभागी झाले होते.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरुद्ध सर्व युनियन एकत्र आंदोलन करत आहेत. आम्ही सर्व मिळून ह्याचा निषेध करतो आणि त्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते आम्ही करू. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने खलाश्यांच्या वेतन करारातल्या बर्याच मागण्या अजून पूर्ण केल्या नाहीत. नाविकांच्या हक्कावर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही. याप्रसंगी हजारो नाविकांच्या साक्षीने कामगार संघटनातर्फे सरकारला निवेदन देण्यात आले. हे आंदोलन नुसीचे सरचिटणीस मिलिंद कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.