आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

विशाल पवार अटकेत

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या राहत्या घराजवळ शुक्रवारी (दि. 13) रात्री हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या विशाल जयसिंग पवार (25) याला उरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. संबंधित इसम दारूच्या व्यसनाधीन असून, त्यातूनच हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

शुक्रवारी रात्री उरण शहरात एक तरुण हातात धारदार शस्त्र (कोयता) घेऊन फिरत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. रात्रीच्या अंधारात तो आमदार महेश बालदी यांच्या घराजवळ पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली. रस्त्यावरून जाणारे नागरिक भयभीत झाले होते. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चौकशीत सदर तरुण हा साई दर्शन अपार्टमेंट, ठाकूरनगर, कामठा, उरण येथील रहिवासी विशाल जयसिंग पवार असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात तो दारूच्या व्यसनाधीन असल्याचे समोर आले असून त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी फिर्यादी मिलिंद गणपत कारंडे यांनी विशाल पवार विरोधात तक्रार दाखल केली आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Exit mobile version