मुंबई हायकोर्टाचे समन्स; आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टात दोन याचिका
। उरण । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार महेश रतनलाल बालदी यांच्या विजयाला आव्हान देणार्या दोन याचिकांवर मंगळवारी (दि.11) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. भाजप आमदार महेश रतनलाल बालदी आणि भारतीय निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे.
बालदी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी उरण मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवत जिंकली होती. याचिकाकर्ते सुधाकर शांताराम पाटील यांच्या वतीने वकील राजेश कचरे यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. मतदार असल्याचे सांगत सुधाकर पाटील यांनी मालमत्ता जाहीर न केल्याच्या आधारावर बालदी यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं आहे. मालमत्तेच्या चौकशीसाठी महेश बालदी यांना न्यायालयात खेचण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये याच मुद्द्यावरुन दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर उच्च न्यायालयाच्या दुसर्या खंडपीठात अद्याप सुनावणी सुरू आहे.
दुसरी याचिका प्रीतम म्हात्रे यांनी दाखल केली आहे. प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर बालदी यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत बालदी यांना 95,390, तर म्हात्रे यांना 88,878 मते मिळाली होती. प्रीतम म्हात्रे यांच्या वकील प्रियंका ठाकूर म्हणाल्या की, बालदी यांच्या निवडणुकीला भ्रष्टाचारच्या आधारावर आव्हान देण्यात आले होते आणि त्यांचा विजय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन्ही याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब केली आहे.