| पेण | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेवर न देणे, अभिलेखे अद्ययावत न करणे तसेच मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ करणार्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकार्याविरुद्ध गावातील कुठलीही तक्रार आल्यास विनाविलंब कारवाई केली जाणार आहे.
तालुक्यात एकूण 65 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी एकूण 46 ग्रामसेवक आहेत. ग्रामपंचायतींच्या तुलनेत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्यांची संख्या कमी असल्याने काही जणांवर दोन-दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येतात. तसेच विविध प्रामणपत्रे दिली जातात. याशिवाय, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यिात येतात. जिल्हयातील सर्व नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आणि ग्रामपंचयातीतल महत्त्वाचा दुवा ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी ठरतात. त्यामुळे या अधिकार्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे, दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या निदर्शनास हे अधिकारी ग्रामपंचायतीत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहत नाहीत. परिणामी, विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाहीत. याशिवाय, ग्रामपंचायतींचे अभिलेखे अद्ययावत ठेवत नाहीत, असे सततच्या तक्रारींवरुन आढळून आले आहे.
माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता, असे आढळून आले आहे की, ग्रामसेवक वडखळ, दादर, कोपर, झोतीरपाडा, दिव, आमटेम, करोटी, वरेडी, बोर्झे, मुंढाणी, जावळी यांनी मुख्यालयात राहत असल्याचे हमीपत्रही पंचायत समितीत दिलेले नाहीत. तसेच इतर ज्या ग्रामसेवकांनी मुख्यालयात राहत असल्याचे हमीपत्र दिले आहेत. ते देखील खोटे असल्याचे आढळून येत आहेत. या ग्रामसेवकांना मुख्यालयात राहत असल्याचा दाखला सरपंच देत असल्याने चुकीचा दाखला देणार्या सरपंचांवर देखील कारवाई व्हावी. सरपंच आणि ग्रामसेवक यांचे आर्थिक लागेदोर असल्याने सरपंच ग्रामसेवकांना खोटे दाखले देत आहेत. असे ही समोर येत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अवर्जून लक्ष द्यावे जेणेकरुन कामचुकार व मुख्यालयात राहत नसणार्या ग्रामसेवकांविरुद्ध कारवाईसाठी ठोस पावले उचलली जातील.
ग्रामसेवकांची उडवाउडवी
पेण पंचायत समितीतून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार काही ग्रामसेवकांना भ्रमंती ध्वनीवरुन संपर्क केला असता मुख्यालयाच्या गावामध्ये कुणाच्या घरात राहतोय हेही सांगता आले नाही. जितेंद्र म्हात्रे (आंबेगाव), शितल जाधव (बळवली), गणेश वसंत पाटील (बोरगाव), दिनेश मारुती मोहरकर (डोलवी), वृषाली कमलाकर म्हात्रे (रोडे)या सर्वांनी एकच उत्तर दिले की आम्ही आत्ता कामात आहोत. नंतर सांगतो. महत्वाची बाब म्हणजे ज्या घरात आपण आठवडयाचे सहा दिवस राहतो त्या घरमालकाचे नाव माहिती नाही. हे सांगणे किती योग्य आहे. तसेच ज्या ज्या सरपंचाने या ग्रामसेवकांना दाखले दिले आहेत. ते ही ग्रामसेवकांच्या बरोबर तेव्हढेच जबाबदार आहेत. तर तन्वी रुपेश म्हात्रे (कोलेटी), स्मिता नरेश पाटील (दुष्मी- खारपाडा), तृप्ती देवराम पुगावकर (करंबेळी आराव), शामल संगम मोकल (कळवे) या ग्रामसेवीकांना फोनच लागले नाहीत.