बेलघर ग्रामस्थ रंगले विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील मौजे बेलघर येथे विठ्ठल रखुमाई मंदिराचा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. 17 व 18 मे असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात बेलघर ग्रामस्थ विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात रंगल्याचे चित्र पहायला मिळाले. मोहिनी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळा देखील पार पडला.

आयोजित कार्यक्रमांमध्ये सकाळची काकड आरती, घटस्थापना, ज्ञानेश्‍वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदी-कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा प्रामुख्याने समावेश होता. वासुदेव अडखले व समस्त हरिपाठ मंडळ यांच्या हरीपाठ व किर्तनाने तसेच लेझिम, ढोल व बाजाच्या जल्लोषात काढण्यात आलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मिरवणुकीने बेलघर गावाला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र भासत होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दरम्यान, बेलघर ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम नियोजन पूर्ण पार पडले.

Exit mobile version