हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर सूट
। पुणे । वृत्तसंस्था ।
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या 74 हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या देयकावर 20 व 21 नोव्हेंबर रोजी 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदारांना प्रोत्साहित करण्याकरिता पूना होटेलियर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे, पूना हॉटेल असोसिएशनशी संलग्न हॉटेल्समध्ये या सवलतीचा लाभ घेण्याकरीता मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून देयकावर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोडल अधिकारी तांबे यांनी केले आहे.