खासदार शाहू महाराज कडाडले
। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात महायुतीने साडेचार हजार कोटींच्या कामाचा प्रारंभ केला. मात्र, प्रत्यक्षात काहीही न देता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरची फसवणूक केली आहे. शंभर कोटींची घोषणा झाली ते 100 कोटी गेले कोठे? असा सवाल करत सामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, हाच हेतू ठेवून राजेश लाटकर यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. लाटकर हे त्सुनामीची लाट आहेत, या लाटेत विरोधकांना ते बुडवून टाकतील. यासाठी प्रेशर कुकर या त्यांच्या निवडणूक चिन्हाचे बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन खासदार शाहू महाराजयांनी केले.
मिरजकर तिकटी येथे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमदेवार राजेश लाटकर यांचा प्रचार प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार शाहू महाराज म्हणाले, महाविकास आघाडी ही जनतेच्या विकासाचा विचार करणारी आघाडी आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच विजयी होणार आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरातील ही निवडणूक एकट्या राजेश लाटकर यांची नाही, तर कोल्हापूरची जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी आहे. राजेश लाटकर हे महाराष्ट्रातील पहिला आमदार असतील जे मोटारसायकलवरून मतदारसंघात फिरतील. राजेश लाटकर म्हणाले, खासदार शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपली उमदेवारी मागे घेतली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हित लक्षात घेऊनच काम करणार आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, पराभूत झाल्यानंतरही राजेश क्षीरसागर यांना उद्धव ठाकरे यांनी महामंडळ दिले. तरीही त्यांनी केलेल्या प्रकाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सरोज पाटील म्हणाल्या, भाजपसारख्या विषवल्ली पेरणार्या पक्षाला दूर करा. यावेळी आर. के. पोवार, भारती पवार, विजय देवणे, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, चंद्रकांत यादव, सुनील मोदी, बाबा इंदुलकर यांची भाषणे झाली.