नाईक-अंतुले महाविद्यालयात मतदान जनजागृती रॅली

| म्हसळा | वार्ताहर |

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी म्हसळयात जनजागृती होण्यासाठी प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीचा कार्यक्रम आज व्हीएनसी कॉलेज, अंजुमन हायस्कूल येथे प्रांत डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके कार्यक्रम झाला. मतदार नागरिकांची नोंदवही, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, चिठ्ठयांची मोजणी ही सर्व प्रात्यक्षिके व नागरिकांच्या शंका दूर करण्यात आल्या. लोकशाही प्रधान भारत देशात आपल्या हक्काचे सरकार निवडुन आणण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी समजून त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचेही आवाहन समीर घारे यांनी केले. यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे 18 वर्षे पूर्ण असल्याने नमुना नं.6 चे फॉर्म भरुन घेतले. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना माहिती देऊन फॉर्मचे वाटप करण्यात आले. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी फक्त मतदार म्हणून नोंदणी न करता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत भाग घेऊन योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे असे कार्यक्रमादरम्यान सूचित करण्यात आले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील, तहसीलदार समीर घारे, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले, व्ही. एन. सी. प्राचार्य दिगंबर टेकळे, मंडळ अधिकारी सलीम शहा, म्हसळा तलाठी गोरख माने आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवणूकीमध्ये नव्याने वापरण्यात येणार्‍या ईव्हिएम-व्हिव्हिपॅट मशिनचे आज झालेले प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वापर, समज-गैरसमज पूर्णपणे दूर झाले. केलेले मतदान ईव्हिएम-व्हिव्हिपॅटमध्ये नोंदले गेल्याची खात्री केली.

साक्षी सुनिल आंजर्लेकर (विद्यार्थिनी)
Exit mobile version