| पनवेल | वार्ताहर |
दुर्धर आजार व मानसीक स्वास्थ्य हरवल्यामुळे रोडवर भटकत असलेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याचे काम पनवेलमधील सील आश्रमाच्यावतीने केले जाते. अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांपैकी 84 जणांनी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासनाचे सर्वांनी आभार मानले आहेत.
पनवेल तालुक्यातील वांगणी येथे सील आश्रम मनोरुग्णांवरील उपचार व पुनर्वसनासाठीचे काम करत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेल्वे स्टेशन, बस स्टँडसह रोडवर फिरणारे मनोरुग्ण, अजारी रुग्णांना आश्रमात आणून त्यांच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत शेकडो नागरिकांना त्यांच्या कुटुूंबियांशी भेट घडवून आणली आहे. ज्यांच्या कुटुंबियांचा शोध लागत नाही त्यांचा मृत्यूपर्यंत आश्रमात सांभाळ केला जातो. सद्यस्थितीमध्ये आश्रमात 275 जणांचा सांभाळ केला जात आहे. रायगडच्या जिल्हाअधिकारी पदावर निधी चौधरी तहसीलदार पदावर विजय तळेकर असताना त्यांनी आश्रमातील नागरिकांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी यातील 89 नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव आले होते.