ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत मतदारांची दिवाळी

निवडणुकीचा उत्साह शिगेला; पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी

| सुधागड-पाली | वार्ताहर |

गणराजाला भावपुर्ण निरोप दिल्यावर त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव ही गेला आणि आता दिवाळीचा सण येऊन ठेपला असतांना दिवाळीच्या काही दिवस आधीच ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे आणि त्यात ठिकठीकाणी आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटत आहेत. सर्वच कार्यकर्ते व्यस्त व जोरात कामाला लागले आहेत. रोजच्या खर्चिला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये दिवाळी आधीच दिवाळी साजरी होत आहे. शिवाय सणाचा उत्साह वाढलेला दिसत आहे.

जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. व 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांनी दिवाळी आहे. त्यामुळे निवडणूक असलेल्या गावांतील लोकांची चंगळ आहे. राजकीय रणधुमाळीत बाजारपेठांमध्ये रेलचेल पहायला मिळत आहे. जिकडे तिकडे उमेदवार मतदारांना आश्वासनांचे फराळ वाटप करत आहेत. त्यामुळे लोकांनाही आता दिवाळीची व मतदानाची ओढ लागली आहे. करण निवडणुका झाल्यानंतर निकालापर्यंत कोणाचा ऍटम बॉम्ब फुटणार आणि कोणाचा बार फुसका ठरणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या काळात विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात मग्न असल्यामुळे दिवाळीची पूर्वतयारी करण्यासाठी कोणालाही वेळ नाही. आणि जोपर्यंत निवडणुका संपुन निकाल लागत नाही तोयर्पंत उसंत नाही असे एका कार्यकर्त्यांनी सांगितले. तर एका पक्षाच्या कार्यकर्त्याने माहिती देताना सांगितले की निवडणुकीच्या काळातच आमची दिवाळी साजरी होत आहे. अनेक ठकाणी दिल्या जाणाऱ्या रोजच्या मेजवाण्या, दिवसाची खर्ची आणि भेटवस्तु यांमुळे सर्वच नागरीक निवडूकांमध्ये राजकीय दिवाळी साजरी करतांना दिसत आहेत.

प्रचाराची तयारी
आता ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असल्याने उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. शक्ती प्रदर्शनास देखील सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रक्ताचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उभे आहेत. यामुळे नक्की कोणाला मतदान करायचे या संभ्रमात मतदार राजा पडला आहे.
गावागावांत निवडणुकीच्या चर्चा
सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. गावागावात, पारावर, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे. कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली याचे विश्लेषण सुरू आहे. शिवाय जेवणावळी, ओल्या सुक्या पार्ट्या आणि रोजची खर्ची सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांसाठी निवडणूक म्हणजे जणू काही दिवाळीच वाटू लागली आहे.
शहरातील मतदारांवर लक्ष
बहुसंख्य मतदार हे सहकुटूंब कामानिमित्त मुंबई, ठाणे व पुणे आदी शहरांत गेले आहेत. तर अनेक आदिवासी कुटुंबे कामानिमित्त तात्पुरती स्थलांतरित झाली आहेत. हे मतदार एकगठ्ठा मतदान करतात. शिवाय त्यांची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते या हक्काच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यांची विशेष मर्जी सुद्धा राखली जात आहे. शिवाय मतदानाच्या आदल्या दिवशी खाजगी गाड्यांनी त्यांना आणण्याची व खाण्या पाण्याची बडदास्त देखील राखली जाते.
Exit mobile version