पेण पंचायत समिती शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम
| पाली | वार्ताहर |
गटविकास अधिकारी पेण, भाऊसाहेब पोळ यांच्या संकल्पनेतून पेण पंचायत समिती शिक्षण विभागाकडून ‘वोट हा डाग चांगला’, या आदिवासी बोलीभाषेतील लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्या माध्यमातून ठिकठिकाणी मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाते. कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या आस्थापनांकडून मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी, पथनाट्य यांसारखे उपक्रम राबवले जात असतानाच आदिवासी बोलीतील हा लघुपट उल्लेखनीय व प्रभावी ठरत आहे.
विशेष बाब म्हणजे पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांनी स्वतः यामध्ये भूमिका साकारली आहे. तर विनोद म्हात्रे, पांडुरंग पवार, रुचिता वाघमारे यांनीही या लघुपटामध्ये काम केले आहे. तसेच, अजय भोईर, प्रफुल्ल सुखचेन, मंगेश कांबळे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. आदिवासी बोली भाषेमध्ये तयार केलेल्या या लघुपटाची कथा व दिग्दर्शन रामकृष्ण भोईर या प्राथमिक शिक्षकाने केलेले असून भोईर यांच्या पाणी या लघुपटास या अगोदर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात असतात, पण सोशल मीडियाच्या युगात लघुपट हा जनजागृतीसाठी जास्त प्रभावी ठरेल म्हणून आम्ही ही निर्मिती केली आहे.
अरुणादेवी मोरे,
गटशिक्षणाधिकारी, पेण