| माणगाव | प्रतिनिधी |
राज्यातील ग्रामपंचायतींतील सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात येणार निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राजकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यात महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 8 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून, उर्वरित 8 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि.28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. याकरिता तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची लगबग सुरु असून तालुक्यातील निवडणूक असलेल्या त्या-त्या ग्रामपंचायत चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक गाव पातळीवर बिनविरोध करण्यात आली असून, सरपंचपदी वसंत बाबाजी कदम हे बिनविरोध निवडून आले. अंबर्ले ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सदस्यपदी अनिता महाबळे, दहिवलीतर्फे गोवेले ग्रामपंचायतीत जहिदा मापकर व झहिरा फैजल गालसूलकर, वडवली ग्रामपंचायतीत निशा जाधव, गांगवली ग्रामपंचायतीत समृद्धी मोरे, नांदवी ग्रामपंचायतीत राजेश म्हाप्रळकर, गोवेले ग्रामपंचायतीत गणेश गोविलकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर टोळखूर्द ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी आज मतदान होत असून उर्वरित काकल, पहेल, हरकोल, विहूले, कुमशेत, शिरवलीतर्फे निजामपूर, देगाव, वणीमलईकोंड या 8 ग्रामपंचायतींची कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी दि.29 एप्रिल 2026 बुधवारी होणार आहे.







