जिल्ह्यात उद्या मतदान

24 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान बुधवारी (दि.20) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. 24 लाख 88 हजार 788 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात 14 उमेदवार असले, तरी महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील, शिंदे गटातील उमेदवार महेंद्र दळवी आणि अपक्ष उमेदवार यांच्यापैकी कोणाला मतदारांचा कौल मिळतोय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये युवा, महिला व 85 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघातील दोन हजार 790 केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. अलिबागसह अन्य मतदारसंघातील नेमणूक केलेले कर्मचारी सकाळपासून मतदान केंद्रात रवाना झाले आहेत. प्रत्येक केंद्रात पोलिसांसह सहा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबत मेडिकल किट व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कर्मचारी व साहित्यांची ने-आण करण्यासाठी दोन हजार 800 वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यात 124 मिनीबस आणि जिपचा समावेश आहे. वीस हजारांहून अधिक कर्मचार्‍यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस सेक्टर पेट्रोलिंगसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबत नेमण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीसांना सहकार्य करण्यासाठी निवृत पोलीस अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आरएसपीचे शिक्षक, एनसीसीचे विद्यार्थी असे रायगड जिल्ह्यात 577 विशेष पोलीस अधिकारी असा दर्जा देऊन नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात 24 लाख 88 हजार, 788 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55 हजार 893, 85 वर्षांपुढील 35 हजार 863, दिव्यांग 13 हजार 191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदारांचा समावेश आहे.

49 केंद्रांवर वॉकीटॉकीचा वापर
जिल्ह्यातील 49 केंद्रांवर इंटरनेट व इतर सुविधांचा अभाव आहे. मोबाईल फोन लागणार नाहीत. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकी, पोलीस वायरलेस आणि सॅटेलाईटचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


मतदारसंघ उमेदवार मतदार

188 पनवेल136 लाख 52 हजार,062
189 कर्जत093 लाख, 18 हजार, 742
190 उरण143 लाख, 42 हजार, 101
191 पेण073 लाख, 07 हजार, 979
192 अलिबाग143 लाख, 06 हजार,230
193 श्रीवर्धन112 लाख, 65 हजार, 286
194 महाड052 लाख,96 हजार, 388
एकूण7324 लाख, 88 हजार, 788

Exit mobile version