। खोपोली । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पाडले. या निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदार संघातील महायुतीचे महेंद्र थोरवे, महाविकास आघाडीचे नितीन सावंत आणि अपक्ष उमेदवार सुधाकर परशुराम घारे या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल त्यानंतर कोण जिंकणार आहे हे कळणार असले तरी आजपर्यंत झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यावेळी कर्जत-खालापूर मतदारसंघात 70.21 टक्के तर, खोपोली शहरात 63.02 टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी नंतर कोण जिंकणार याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी भाजप, आरपीआय पक्षातील दिग्गज नेते होते. तसेच, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे थोरवे यांचे विरोधकांना मोठे आव्हान होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या पक्षातील नेते शिंदे गटात गेल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली होती. महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रचारात नसल्यामुळे सावंत यांची पिछेहाट होईल असा राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षाचा राजिनामे दिलेले कार्यकर्ते होते. इतर घटक पक्षाचा पांठिबा मिळाल्यामुळे सुधाकर घारे यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान ठेवले असून महेंद्र थोरवे त्यांच्यातच महत्वपुर्ण लढत होईल, अशी चर्चा सुरू आहे.
संपुर्ण कर्जत-खालापूर मतदारसंघात 3 लाख 18 हजार 742 मतदान आहे. त्यापैकी 2 लाख 23 हजार 783 मतदान झाले असून 70.21 टक्के मतदान झाले. खोपोली शहरात एकूण 61 हजार 205 मतदार आहेत, त्यापैकी 38 हजार 781 मतदान झाले आहे म्हणजे 63.36 टक्के मतदान झाले आहे.