| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलमधील वडाळे सरोवर परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे वडाळे सरोवराचे रूपांतर गवताळ प्रदेशात झाले की काय, असा प्रश्न पनवेलकरांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसामुळे वडाळे सरोवराच्या काठावर तसेच पाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य झाकोळले जात आहे. गवत वाढल्यामुळे सरोवरातील जैवविविधतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच, वाढलेल्या गवतामुळे डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याचा त्रास परिसरातील नागरिक आणि सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांना होत आहे. दरम्यान, सरोवर परिसरात नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत पनवेल पालिकेने सरोवरातील गवत काढण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सरोवर परिसरातील वाढलेले गवत हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, केवळ तात्पुरती साफसफाई न करता नियमित देखभाल करण्याची अपेक्षा पनवेलकरांकडून व्यक्त होत आहे.
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
