वडाळे तलावाचा होणार कायापालट

सुशोभिकरणावर आतापर्यंत 13 कोटींचा खर्च; पनवेलकरांची पर्यटनासाठी मिळतेय पसंती

| पनवेल | प्रतिनिधी |

आकर्षणाचे केंद्र बनलेल्या वडाळे तलावात पालिकेतर्फे लवकरच बोटिंग सेवा आणि इतर मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्यात येऊन तलाव व परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तलावात आणि तलावाच्या परिसरात इतरही मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्त करण्यासाठी पालिकेतर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, नियुक्त कंत्राटदारामार्फत तलाव परिसरातील सुविधांचे संचालन आणि देखभाल केली जाणार आहे.

ऐतिहासिक वारसा असणार्‍या पनवेल शहरात जवळपास पाच तलाव आहेत. पालिका हद्दीत असणार्‍या तलावांचे संवर्धन करण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले असून, तलावांच्या सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील वडाळे तलाव ज्याला बल्लाळेश्‍वर तलाव म्हणूनही ओळखले जाते. हा सर्वात मोठा तलाव आहे. 25 एकरांवर पसरलेल्या या तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत 13 कोटी रुपये खर्च केला आहे. या खर्चातून वडाळे तलावाचे ऐतिहासिक स्वरूप जैसे थे ठेवून नव्याने सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुशोभिकरण करण्यात आलेल्या या तलावाला दररोज शेकडो पनवेलकर भेट देत आहेत. पनवेलकरांची तलावाला मिळत असणारी पसंती पाहून तलावाला भेट देणार्‍यांसाठी परिसरात जास्तीत जास्त मनोरंजन सुविधा वाढवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहेत. त्याचप्रमाणे तलावाला भेट देणार्‍यांसाठी तलाव परिसरात खाद्य विक्रीची दुकानेदेखील सुरु केली जाणार आहेत

पर्यटकांचे आकर्षण
खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून वडाळे तलावात थीम-आधारित कारंजे शो, कॅनोइंग, फ्लाइंग बोर्ड, फ्लोटिंग वॉटर पार्क आणि बोटिंग पॅडल बोट्स आणि शिकारा राइड्स यांचा समावेश केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी सशुल्क सेवा
तलाव परिसरात विद्यार्थ्यांसाठी वॉकिंग म्युझियम, संगीत आणि सांस्कृतिक महोत्सव, योग शिबिरे आणि विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचा समावेश केला जाणार आहे. या सर्व सेवा पैसे द्या आणि वापरा या आधारावर उपलब्ध असणार आहेत.

Exit mobile version