रुरल अँड यंग फाऊंडेशनकडून संगणक भेट
| वाघ्रण | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघ्रण शाळा रुरल अँड यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून डिजिटल प्रशिक्षण वर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेसाठी एक संगणक, एक लॅपटॉप आणि टीव्ही संच भेट देण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची जोड देऊन शिक्षणाचा प्रसार विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून हे कार्य करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे सुशील साईकर, प्रणव पाटील यांनी सांगितले.
शनिवार, दि.25 रोजी या डिजिटल संगणक प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ईशस्तवन व स्वागतगीत म्हणत मुलांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सरपंच राजेंद्र पाटील, सदस्या अक्षदा म्हात्रे, शाळा केंद्रप्रमुख श्याम पाटील, वाचनालय अध्यक्ष उदय पाटील, डॉ. कृष्णकांत पाटील, रुरल अँड यंग फाऊडेशनचे सुशील साईकर, प्रणव पाटील, सेवाश्रम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार दीपक यशवंत पाटील, शाळा समिती पदाधिकारी वैभव पाटील, मचाले पेढांबे ग्रा.पं सदस्य रुपेश पाटील, दयानंद म्हात्रे, पोपा सोनल पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका संगिता म्हात्रे यांनी पटवाढीसाठी पालक तसेच ग्रामस्थांना आवाहन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी गुणगौरव समारभ म्हणून अनिल रमाकांत पाटील वाचनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर लेखन स्पर्धेतील विजेत्या सुयोग गावंड, भाव्या म्हात्रे व नव्या पाटील, तर शिक्षक निलेश वारगे पुरस्कृत किल्ले स्पर्धेतील विजेते सार्थक गावंड, पर्व पाटील आणि पर्णवी पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वारगे यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीकांत म्हात्रे, चित्रकार प्रथमेश म्हात्रे, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, रुपाली पाटील, पालक शाळा समिती सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.