| शिरूर | वृत्तसंस्था |
लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या वाट्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना आला असून पक्षाने माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील भाजप नेते प्रदीप कंद, राहुल पाचर्णे (दोघेही शिरूर विधानसभा), आशा बुचके (जुन्नर), अतुल देशमुख (खेड) हे नेते आणि जुन्नरचे शिवसेनेचे शिंदे गट माजी आमदार शरद सोनवणे हेही अद्याप फारसे सक्रिय झालेले दिसत नाहीत. भाजपचे अतुल देशमुख आणि आशा बुचके हे दोघे तर उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलाविलेल्या समन्वय बैठकीला अनुपस्थित होते. भोसरीचे आ. महेश लांडगे आणि हडपसरचे माजी आ. योगेश टिळेकर हे दोघेही अद्याप सक्रिय झालेले नाहीत. आढळराव पाटील हे हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार चेतन तुपे यांच्याशी जवळीक साधत असल्याने टिळेकर अद्याप तटस्थ आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग) शरद बुट्टे पाटील यांनी मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारास सुरवात केली आहे. सध्या भाजप नेते केवळ महायुतीतील घटक पक्षाच्या समन्वयक बैठकांना हजेरी लावणे पसंत करत आहेत. घटक पक्षांतील नेत्यांनी अद्याप संयुक्त प्रचार सुरू केलेला नाही. दरम्यान, या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान असल्यानेही प्रचारास सुरुवात झाली नसल्याची चर्चा आहे.