पद्मदुर्ग किल्ल्याला जेट्टीची प्रतीक्षा

जंजिरा किल्ल्याला 100 कोटी आणि पद्मदुर्गाकडे दुर्लक्ष
कोकण कडा व पद्मदुर्ग जागर समितीने वेधले लक्ष
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पवन झालेला पद्मदुर्ग किल्ला जेट्टीच्या प्रतीक्षेत आहे .जंजिरा किल्ल्यासाठी नुकतेच 100 कोटी खर्चून जेट्टी बांधण्यात येणार आहे. परंतु शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.पद्मदुर्गाला जेट्टी बांधण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागते असा सवाल महाडचे शिवप्रेमी कोकण कडा व मुरुडच्या पद्मदुर्ग जागर समितीने केला आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन करावे अशी सरकारची भूमिका असताना शिवरायांचा पद्मदुर्ग सुविधांपासून वंचित ठेवण्यात आला आहे. कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार व पद्म दुर्ग जागर समितीचे अध्यक्ष अशील ठाकूर यांनी पद्मदुर्ग किल्ल्यासाठी तातडीने तरंगती जेट्टी उभारण्यात यावी अशी मागणी पुरातत्व विभागाकडे केली आहे. शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला पर्यटकांना सहज पाहता यावा यासाठी जल वाहतूक सेवा व पर्यटकांना उतारण्यासाठी अद्यावत जेट्टी आवश्यक आहे .या जेट्टीची मागणी गेली अनेक वर्ष होत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हि खेदाची बाब आहे.

पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत एक मुख्य किल्ला आणि त्यासमोर पडकोट आहे.पडकोट मोठ्याप्रमाणावर नाहीसा झालेला, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे.पडकोट हा शत्रूला चकवण्यासाठी बांधला गेलेला आहे.पद्मदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरला आहे, परंतु साडेतीनशे वर्षापासून असलेले दगड सागराच्या खाऱ्या पाण्याने तटबंदीचा दगड एकदम भिजून गेला परंतु चुना अजूनही चांगला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग पण आपल्याला चकित होण्यासारखे आहे.या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसून येतो. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे. शिवाराच्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्यात जेट्टी बनवावी व पर्यटन वाढीसाठी गडावर शिवस्मारक बनवावे. अशी मागणी शिवप्रेमी कोकण कडा व मुरुडच्या पद्मदुर्ग जागर समितीने केली आहे.

Exit mobile version