पनवेल महानगरपालिका आयुक्तांच्या प्रतिक्षेत

| पनवेल | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर एकाच महापालिकेत तीन वर्षापेक्षा अधिक वेळ काम केल्यामुळे पनवेल महापालिकेचे आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांची बदली झाली. देशमुख यांच्या बदलीनंतर पनवेल महापालिकेचे आयुक्त पद गेले दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ रिक्त आहे. या रिक्त पदावर अद्याप नगरविकास खात्याकडून कोणत्याच अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात न आल्याने महापालिकेचा कारभार अडचणीत आला आहे. दरम्यान, आयुक्तपदाचा कारभार अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर नगरविकास विभागाने (दि.20) मार्चला काढलेल्या आदेशानुसार तत्काळ प्रभावाने बदली झालेल्या अधिकार्‍यांना पद सोडावे लागले. तेव्हापासून महापालिकेचे आयुक्त पद रिक्त झाले आहे. सध्या या पदावर येण्यासाठी मंत्रालयात अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उड्या पडत आहेत. पनवेल महापालिका ही मडफ वर्गातील महापालिका आहे. डॉ. सुधाकर शिंदे सोडले तर अद्याप एकही आयएएस दर्जाचा अधिकारी पनवेल महापालिकेवर आलेला नाही. देशमुख यांच्यासोबत उपायुक्त गणेश शेटे आणि सचिन पवार या दोन अधिकार्‍यांच्याही बदल्या झाल्या. त्या रिक्त जागेवर डॉ. बाबासाहेब राजळे आणि मारुती गायकवाड या दोन अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे; परंतु नगरविकास विभागाला आयुक्तपदावर अधिकारी पाठवण्याचा मुहूर्त मिळाला नाही.

मंगेश चितळे यांच्या नावाची चर्चा 
पनवेल नगर परिषद असताना त्यावेळचे मुख्यधिकारी मंगेश चितळे हे पुन्हा पनवेल महापालिकेवर आयुक्त म्हणून येतील, अशी चर्चा पनवेल महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर चितळे यांनी काही काळ उपायुक्त म्हणूनही कामकाज केल्यानंतर त्यांची बदली झाली होती. आता ते कल्याण-डोंबिवली महापालिकेवर अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
Exit mobile version