रस्त्यावरील भंगार तात्काळ उचलला
नेरळ, प्रतिनिधी
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ममदापूर येथे नेरळ विद्या मंदिर शाळेच्या जवळील स्त्यावर एक लेन बंद करून भंगार साठवून ठेवण्यात आले होते. याबाबत दैनिक कृषीवलच्या 22 ऑगस्ट रोजी ‘रस्त्यावर भंगाराचे ढीग’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. या दणक्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली असून, तात्काळ या रस्त्यावरील भंगार जेसीबी मशीनचे सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करून घेतला आहे.
नेरळ विद्या मंदिर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी शिक्षण घेणारे तीन हजार विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करीत असतात. त्या ठिकाणी भंगार साहित्य दिवसेंदिवस रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबद्दल पालक वर्गाने शाळकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शेवटी पालकवर्गाने समाजमाध्यमे यांच्यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, कृषीवलने वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेतली आणि सकाळी अकरा वाजता जेसीबी मशीनसह बांधकाम खात्याचे अधिकारी नेरळ येथे पोहोचले. उपअभियंता संजीव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता पाटील यांनी कल्याण कर्जत रस्त्याची भंगाराच्या साहित्याने बंद झालेली लेन मोकळी करून घेतली आहे. त्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडे देखील कापून टाकण्यात आली असून, आता रस्ता अखंडपणे मोकळा झाला आहे.
आमच्याकडे तक्रार आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. आता त्या भंगार विक्रत्यांना विभागाकडून नोटीसदेखील बजावण्यात येईल आणि त्यानंतरदेखील भंगार रस्त्यावर आले तर कायदेशीर कारवाई संबंधित यांच्यावर केली जाईल.
संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
.