धनगर समाजाची पदयात्रा

एसटी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी रविवार कळंबोली ते पनवेल अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नवी मुंबईमधील हजारो धनगर बांधव पदयात्रेत सहभागी झाले होते. मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले. मात्र त्याला फारसे यश आले नाही.

सनदशीर मार्गाने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल, असे जर सरकार सांगत असेल आणि आरक्षणाची अंमलबजावणी करणार नसेल, तर मतदानाच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवू, असा इशारा धनगर समाजाचे नेते तुकाराम सरक यांनी दिला. कळंबोली व कामोठे शहरात धनगर समाजाच्यावतीने “उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो,“ एक दिवस समाजासाठी “यळकोट यळकोट… जय मल्हार“ च्या घोषणांनी शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग असल्याचे दिसून आले.

मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगरसमाज बांधव रस्त्यावर उतरले होते. हनुमान मंदिर, कारमेल स्कूल, करावली चौक, सायन पनवेल महामार्ग ते कामोठे स्टॉप, कामोठे मायाक्का मंदिर अशी पदयात्रा निघाली होती. मायाक्का मंदिर येथे पोचल्यानंतर पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले.

Exit mobile version