। वावोशी । वार्ताहर ।
कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खोपोली आणि खालापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थित कामगारांना विविध कामगार कायदे आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी चालता-बोलता संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कामगार कायद्यांचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या संवाद कार्यक्रमात इमारत आणि इतर बांधकाम कामगार अधिनियम, प्रसूती लाभ अधिनियम, वेठबिगार पद्धत अधिनियम, कंत्राटी कामगार अधिनियम, समान वेतन अधिनियम, काम विवाद कायदा, कामगार भरपाई अधिनियम, वेतन प्रदान अधिनियम, औद्योगिक विवाद कायदा, व्यवसाय संघ अधिनियम या सर्व कायद्यांची माहिती देण्यात आली. त्यासाठी स्टेट बँक एटीएम, दीपक हॉटेल आणि इंदिरा चौक फाटा येथील असंघटित कामगार यांच्याशी संवाद साधण्यात आला.
या संवाद कार्यक्रमात साधारणतः 100 हून अधिक असंघटीत कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाअंनिसचे रायगड जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड, खोपोली खालापूर शाखा अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड, रायगड जिल्हा प्रधान सचिव संदीप गायकवाड, खोपोली शाखा प्रधान सचिव महेंद्र ओव्हाळ, महिला विभाग प्रमुख वैशाली कळसाईत, युवा विभाग प्रमुख रोहन दळवी, हितचिंतक सभासद दिनेश गायकवाड, रवी ओव्हाळ, गणेश गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.